पुणे: पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी पीडित मुलीला घरात बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र, पीडितेच्या बहिणीला हा प्रकार समजताच तिने दरवाजा तोडून नराधमाच्या तावडीतून बहिणीची सुटका केली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित मुलगी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एकमेकांच्या घराशेजारी राहतात. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपीनं घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दूध आणण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलवलं. त्यानंतर पीडित मुलगी घरी आल्यावर आरोपी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता.
दरम्यान, हा प्रकार कळताच पीडितेच्या बहिणीने तातडीने आरोपीच्या घरी जात दरवाजा ठोठावला. पण आतून आरोपीनं दार उघडलं नाही. यामुळे संबंधित मुलीने बहिणीला वाचवण्यासाठी थेट आरोपीच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर तिने आतमध्ये प्रवेश करत नराधमाच्या तावडीतून आपल्या अल्पवयीन बहिणीची सुटका केली. मात्र नराधम आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.