पुणे: व्यावसायिक (Pune Crime) स्पर्धेतून एका दुकानदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मारुंजी परिसरात घडली आहे. या प्रकरणी 47 वर्षीय दुकानदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास चार आरोपी आपसांत संगनमत करून फिर्यादीच्या दुकानात आले. दुकानात आल्यानंतर आरोपींनी “या भागात फक्त आमचाच व्यवसाय चालेल” अशी धमकी देत दुकानदाराला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीदरम्यान आरोपींपैकी एकाने दगडाने दुकानदाराच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा मध्ये पडला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. व्यावसायिक स्पर्धेमुळे अशा प्रकारचे हिंसक प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हिंजवडी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.







