पुणे: कोंढवा परिसरात बडी रातच्या (Pune Crime) निमित्ताने सुरू झालेला किरकोळ वाद पुढे जीवघेण्या हल्ल्यात रूपांतरित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Breaking News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी बडी रात असल्याने असलम खान हे कौसरबाग परिसरात गेले होते. गरीब नवाज मशिदीच्या गेटबाहेर काही जणांमध्ये शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. परिस्थिती चिघळू नये म्हणून असलम खान यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते मुलांना घरी सोडून पुन्हा मशिदीच्या दिशेने जात असताना अफाक आणि शफाक यांनी त्यांना अडवले. “पोलिसांना फोन का केला? हे तुम्हाला महाग पडेल,” अशी धमकी देत ते निघून गेले, असा आरोप असलम खान यांनी केला आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री असलम खान हे लकी फिश हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना अफाक, शफाक आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा आहे. शफाक याने लोखंडी फायटरने असलम खान यांच्या कपाळावर वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिथे पुन्हा तणाव निर्माण झाला. असलम खान यांचा मोठा भाऊ सलीम खान आणि मुलगा अब्दुल समद यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा आरोप आहे. सलीम खान यांच्या पोटात वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले, तर अब्दुल समद यांच्या मांडीला भोसकून जखमी करण्यात आले.
दरम्यान, या घटनेला दुसरी बाजूही समोर आली आहे. शफाक अशफाक शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, बडी रातच्या नमाजीनंतर पार्किंगच्या कारणावरून असलम खान यांच्याशी वाद झाला होता, मात्र आपण माफी मागून तेथून निघून गेलो होतो, असा दावा त्यांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी करीम कॅफेजवळ असलम खान आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही शफाक यांनी केला आहे. रुग्णालयातसुद्धा आपल्यावर आणि आपल्या मित्रांवर पुन्हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद जिब्रान जुनेद सय्यद याला अटक केली असून, इतर 5 ते 7 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा सखोल तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.







