पुणे : पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. वारजे येथील जय भवानी धाब्यासमोर किरकोळ कारणावरुन शिवप्रसाद बबनराव नाईक याचा खुन करुन तब्बल 17 वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने जेरबंद केले आहे.
समीर अशोक भागवत (वय 43, रा. नॅशनल पार्क, माणिक बाग, सिंहगड रोड) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणात इतर दोन आरोपींना पोलिसांनी तेव्हा पकडले होते. परंतु, समीर भागवत हा फरार झाला होता. त्या दोन्ही आरोपींवर खटला चालविण्यात आला होता. त्यात त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
याबाबत राम प्रसाद नाईक (रा. नाईक बिल्डिंग, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 14 मार्च 2008 रोजी जय भवानी धाब्यासमोर घडली होती. यातील आरोपींनी फिर्यादीचा भाऊ शिवप्रसाद बबनराव नाईक व त्यांचा मित्र अजित सोपान गोडांबे यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांना जखमी केले होते. दरम्यान शिवप्रसाद नाईक यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला होता. तेंव्हा पासून या गुन्ह्यात समीर भागवत हा अद्याप फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट 3 मधील पथक गस्त घालत असताना सहायक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे व पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वारजे येथील खुनामध्ये फरारी असलेला आरोपी समीर भागवत हा सिंहगड रोडवरील गोयलगंगा सोसायटीजवळ येत आहे. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन 18 एप्रिल रोजी समीर भागवत याला जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मुंबई शहरातील कुरार पोलीस ठाण्यातील 2011 मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यात समीर भागवत हा फरारी असल्याची माहिती मिळाली. 2011 मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश चौगुले याच्याबरोबर गाडीने जाऊन जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील कार्यवाहीकरीता कुरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तुपसौंदर, सहायक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, कैलास निम्हण, सुजित पवार, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.