पुणे: पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरूपती कॉलनी येथे घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करून त्यांच्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींवर दाखल असलेले वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. आयुष संजय खरात (वय 20, रा. सुखसागरनगर), आर्यन कैलास आगलावे (वय 19, रा. गोकुळनगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिरूपती कॉलनी येथील संतोषी माता मंदीराजवळ घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आंबेगाव पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. हवालदार हनमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना आपल्या गुप्त बातमीदाराकडून आरोपींबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात आरोपींविरुद्ध आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि मार्केडयार्ड पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
आरोपींकडून 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून 22 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार लॅपटॉप, दुचाकी, एक रिक्षा असा 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आर्यन हा कोंढवा व मार्केटयार्ड येथील घरफोडीच्या गुन्ह्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले. उपनिरीक्षक मोहन कळमकर अधिक तपास करीत आहेत.
सदर कारवाई, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, यांच्या पथकाने केली.