पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगुन तरुणींच्या पतिने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने या पाच तरुणींची सुटका केली आहे. हि कारवाई गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा करण्यात आली आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
सुमी सौरभ बिश्वास (वय-३५, रा. मरगी गल्ली, क्रांती चौक, बुधवार पेठ, मुळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना मॅनेजर विक्रम आसीम बिश्वास (वय-२३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), किकास उजल मंडोल (वय-२१), टॉनी युनुस मुल्ला (वय- ३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम शशिकांत हेगडे, रेश्मा सुरेंद्र तुपकर, सिमा अजय आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे, अशी माहिती दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक संगिता जाधव, हवालदार रेश्मा कंक, सहायक फौजदार कुमावत, छाया जाधव, हवालदार नदाफ, भुजबळ हे बुधवार पेठ येथे गेले. अब्राहम याने वाड्यातील त्यांना एक घर दाखविले. दरवाजा मध्ये कुंटणखाना चालिका सुमी बिश्वास बसली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून तपासणी केली. या कारवाई मध्ये त्यांना पाच तरुणी आढळून आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एकीने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे सांगितले. तिच्या मैत्रिणीने बुधवार पेठ येथे काम केल्यास जास्त पैशे मिळतील असे सांगून तिला येथे पाठविले. त्यामुळे ५ महिन्यापूर्वी तरुणी पश्चिम बंगालमधून येथे आली आहे. दुसर्या तरुणीने सांगितले की, मुंबईत घरकाम करत होते, जादा पैशे मिळण्याच्या आमिषाने तिला येथे आणण्यात आले. तिसरी जयपूर वरून येथे आली होती.
दरम्यान, चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्या व्यवसाय करण्यासाठी लावले होते. पश्चिम बंगालमधील १९ वर्षाच्या तरुणीसोबत विशाल मंडोल याने लग्न केले. त्यानंतर तो तिला गावाहून पुण्यात घेऊन आला, आणि तिला वेश्या व्यवसायाला लावले. ग्राहकांकडून मिळणार्या ५०० रुपयांपैकी २५० रुपये सुमी बिश्वास आणि मॅनेजर विक्रम बिश्वास वाटून घेत होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.