हडपसर, (पुणे) : “हॉर्न मारल्याने नागरिकांना त्रास होतो,” असे सांगणाऱ्या पीएमपीएमएल बस चालकाला केबिनमध्ये घुसून रिक्षा चालक, एक महिला आणि त्यांच्या एका साथीदाराने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. हडपसर गाडीतळ बसस्टॉपवर रविवारी (ता. 24) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांवर शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ओमकार गोपाळ कोरे (वय 32, रा. थोरगावा, चिंचवड) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अभिषेक मारुती राखपसरे (वय-24, व्यवसाय- रिक्षा चालक, रा. जयमल्हार कॉलनी, घुलेवस्ती, मांजरी, पुणे), स्वाती सचिन नायर (वय-21, रा. भेकराई नगर, पुणे) व एक अज्ञात इसम (नाव व पत्ता माहिती नाही) अशा तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमकार कोरे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार कोरे हे 2 वर्षांपासून पीएमपीएल बस चालक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी निगडी ते शेवाळवाडी या मार्गावरील बसवर (क्र. MH 12 QG 9206) ड्युटीवर होते. रात्री 10 वाजता निगडीवरून सुटलेली बस शेवाळवाडी येथे पोहोचली आणि तेथून पुन्हा निगडीकडे जाण्यासाठी निघाली. रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बस हडपसर गाडीतळ बसस्टॉपवरून जात असताना, एका रिक्षा चालकाने चालकाला नाहक हॉर्न मारला. त्यावर चालक ओमकार कोरे यांनी “हॉर्न मारल्याने पब्लिकला त्रास होतो,” असे रिक्षा चालकाला म्हटले.
चालकाचे हे बोलणे ऐकताच रिक्षात असलेल्या महिलेने थेट बसच्या आत प्रवेश केला आणि कोरे हे स्टेरिंगवर बसलेले असतानाच त्यांना थापडा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. महिला मारहाण करत असतानाच, तिच्यासोबत असलेला एक वयस्क माणूसही बसच्या केबिनमध्ये घुसला आणि त्यानेही चालकाला अमानुषपणे मारहाण केली.
मारहाण होत असताना रिक्षा चालकाने चालक कोरे यांना “तू मला नंतर भेट, तुला जिवंत मारून टाकतो, तुला बघूनच घेतो,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात मोठा अडथळा निर्माण केला. आरोपी निघून जात असताना चालकाने रिक्षाचा नंबर लिहून घेतला आणि हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हडपसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







