पुणे: पुणे शहरातील पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात पुढील १४ दिवसांसाठी विशेष प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ही जमावबंदी आदेश २६ मे २०२६ पासून सुरू होणार असून, ८ जून २०२६ पर्यंत राहील.

पुणे पोलीस विशेष शाखेच्या उपायुक्तांनी सांगितले कि, जमावबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा सामाजिक सभा, मोर्चे, धरणे आंदोलने आणि निदर्शने करण्यास प्रशासनाने पूर्ण बंदी घातली आहे.
का घेतला जमावबंदीचा निर्णय? जाणून घ्या
राजकीय पक्षांकडून सातत्याने आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढले जातात. तसेच महापालिकेकडून होणाऱ्या अतिक्रमण विरोधी कारवायांमुळे अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होते. दरम्यान, बकरी ईदसह अनेक सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांततेला कोणताही धक्का लागू नये, या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात ‘या’ गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी:
-
इजा करू शकणारे कोणतेही घातक हत्यार सोबत बाळगणे किंवा तयार करणे.
-
दगडसह फेकावयाची साधने तयार करणे किंवा कोणतेही ज्वलनशील, स्फोटक आणि दाहक पदार्थ सोबत बाळगणे.
-
कोणत्याही व्यक्तीचे किंवा नेत्यांचे फोटो, प्रतिमा आणि प्रतिकात्मक प्रेत यांचे प्रदर्शन करणे किंवा ते रस्त्यावर जाळणे.
-
सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी वाजवणे, वाद्य वाजवणे किंवा कोणावरही आक्षेपार्ह टीका करणे.
-
वादग्रस्त भाषणे करणे, फलक, चित्रे किंवा चिन्हे प्रदर्शित करणे.
पोलीस प्रशासनाने सर्व पुणेकर नागरिकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.







