पुणे: पुण्यातील कर्वेनगर भागात एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांवर अॅसिडसारखे रासायनिक द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले आहे.

रात्रीच्या वेळी एका विकृत व्यक्तीने रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर रासायनिक द्रव ओतले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाड्यांवर विचित्र डाग पडलेले दिसले. काही वाहनांचे भाग रासायनिक द्रव्यामुळे पूर्णपणे जळून खराब झाले होते. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे गाड्यांचे अतोनात नुकसान झाले असून, वाहनमालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाहनांच्या दुरुस्तीसाठी आता हजारो रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा प्रकार कोणत्या वैयक्तिक वादातून केला आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी, याचा शोध पोलीस घेत आहेत.







