कोंढवा: कोट्यवधी रुपयांची कौटुंबिक संपत्ती बळकावण्यासाठी आणि घरातून निघून गेलेल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी एका व्यक्तीने सासरच्या लोकांवर काळी जादू केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. कोंढवा परिसरातील कौसरबाग कबरस्तानात १९ मे रोजी मध्यरात्री १२:२० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असतानाही पुण्यात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी परवेज अब्दुल अजीज मेमन नावाच्या आरोपीविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या मेव्हण्याने, म्हणजेच हसनेन रफिक जाफरानी (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. आरोपी परवेज याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते, ज्यामुळे ती सध्या वेगळी राहत होती. पत्नीला वश करणे आणि सासू-सासऱ्यांची अफाट संपत्ती स्वतःच्या नावावर करणे, हा या अघोरी पूजेमागील मुख्य हेतू होता.
मध्यरात्रीच्या सुमारास कबरस्तानात काहीतरी संशयास्पद हालचाली होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपी परवेज हा सासू, सासरे, मेव्हणा आणि मेव्हण्याच्या पत्नीच्या छायाचित्रांवर सुया टोचून पूजा करत असल्याचे दिसून आले. संतप्त रहिवाशांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. सुरुवातीला त्याने खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र नागरिकांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
या घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.







