पुणे: जागतिक पातळीवर राजकीय तणावामुळे देशांतर्गत बाजारात महागाईचा भडका उडाला आहे. रोजच्या जगण्यातील आवश्यक वस्तू जसे की, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर आधीच वाढलेले असताना, आता मौल्यवान सोने- चांदीनेही उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सतत घसरत असल्यामुळे देशात सोन्याची आयात करणे अत्यंत खर्चिक बनले आहे. परिणामी, भारतात सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

देशातील प्रमुख शहरांचा विचार केला तर सोन्याच्या दरांमध्ये किरकोळ तफावत पाहायला मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह कोलकाता आणि गुवाहाटी येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹1,59,380 प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्यासाठी ₹1,46,100 आणि १८ कॅरेटसाठी ₹1,19,540 मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्ली, लखनौ, मेरठ, अयोध्या, कानपूर, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, चंदिगढ, जयपूर आणि लुधियाना या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹1,59,530 असून २२ कॅरेटसाठी ₹1,46,250 आणि १८ कॅरेटसाठी ₹1,19,640 इतका भाव आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹1,61,240, २२ कॅरेटचा ₹1,47,800 आणि १८ कॅरेटचा ₹1,24,000 वर गेला आहे. पटणा आणि इंदूरमध्ये २४ कॅरेटचा भाव ₹1,59,430 आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या किमतींमध्येही चांगलीच वाढ झाल्याचे चित्र आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये म्हणजेच मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे चांदीचे दर एकसमान पातळीवर आहेत. आज बाजारात १० ग्रॅम चांदीचा भाव ₹28,500 इतका झाला आहे. तर १०० ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ₹2,85,000 मोजावे लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १ किलो चांदीचा दर आता तब्बल ₹28,50,000 वर पोहोचला आहे.








