पुणे: रात्रीच्या अंधारात मोकळ्या मैदानात १७ वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. डोळा आणि कवटीजवळ गंभीर जखमा होत्या. जवळच त्याची दुचाकी होती; मात्र मोबाइल आणि दुचाकीची चावी गायब होती. सुरुवातीला गोळीबार करून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र हत्यार कोणते, खून कोणी केला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. अखेर मृत तरुणाच्या मोबाइलवर आलेल्या फोन कॉलच्या आधारे तळेगाव दाभाडे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत खुनाचा उलगडा केला.

तळेगाव दाभाडे येथे २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी १७ वर्षीय तरुण दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. मोबाइलही बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री सव्वाबाराच्या सुमारास एका खासगी कंपनीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी २३ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दुर्गनाथ साळी आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मृत तरुणाचे कोणाशी पूर्ववैमनस्य होते का, याची माहिती घेण्यात आली. मात्र, सुरुवातीला कोणताही ठोस धागा पोलिसांच्या हाती लागला नाही.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. मृत तरुणाच्या मोबाइल क्रमांकाचे विश्लेषण करण्यात आले असता, घटनेपूर्वी आलेला एक फोन कॉल संशयास्पद आढळून आला. हा कॉल ज्या मोबाइल क्रमांकावरून करण्यात आला होता, त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
फोटो काढायचे आहेत, लवकर ये
चौकशीदरम्यान संबंधित तरुणाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहिती समोर ठेवून कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
मृत तरुणाच्या चुलत भावाने त्याच्या मित्राच्या मोबाइलवरून त्याला फोन केला होता. “तुझ्या आयफोनमध्ये चांगले फोटो येतात. इकडे ये, फोटो काढू,” असे सांगून त्याला बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मृत तरुणाच्या चुलत भावाला ताब्यात घेतले.
चौकशीत खुनामागील कारणही समोर आले. मृत तरुणाकडे महागडा आयफोन, दुचाकी आणि चांगले कपडे होते. तो आयफोनवर फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असे. याच इर्ष्येतून त्याला संपविण्याचा कट त्याच्या चुलत भावाने रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आयफोन फोडला, पण कॉलचा पुरावा राहिला
१७ वर्षीय तरुण घटनास्थळी आल्यानंतर त्याच्यावर टोकदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा आयफोन आणि दुचाकीची चावी घेऊन संशयित पसार झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी आयफोन फोडण्यात आला. मोबाइल फोडून पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, घटनेपूर्वी करण्यात आलेल्या फोन कॉलची तांत्रिक नोंद पुसता आली नाही. हाच कॉल पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आणि त्याच्या आधारे खुनाचा उलगडा करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमधूनही पुरावे
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस अंमलदार अमोल गोरे, ज्ञानेश्वर तोडकर, स्वप्नील चांदेकर, आकाश भालेराव आणि विकास तारू यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
या फुटेजमध्ये मृत तरुणाचा चुलत भाऊ आणि त्याचा मित्र नदीच्या परिसराकडे जाताना तसेच परत येताना दिसून आले. उपलब्ध तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.







