पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसई २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून काही बदल करत आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सीबीएसई आता विद्यार्थ्यांना टक्केवारी किंवा श्रेणी देणार नाही. विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल तर प्रवेश देणारी संस्था बेस्ट ५ विषयांचे गुण घेऊन प्रवेश देणार आहे. याबाबतची माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली. सीबीएसईने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची पद्धत बंद केली आहे. त्यानंतर आता श्रेणी आणि टक्केवारी देण्याची प्रथा बंद केली आहे.
यासंदर्भातील तरतूद सीबीएसईच्या नियमावलीत करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम पाच विषय निवडून प्रवेश दिला जाणार आहे. यंदापासून सीबीएसईकडून गुणांची टक्केवारी, श्रेणी दिली जाणार नाही. तसेच नोकरीसाठी गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास नोकरी देणारी नियोक्ता विषयांवरुन निर्णय घेऊ शकतात. ही संस्था गुणांची बेरीज करुन टक्केवारी काढू शकते. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
दरम्यान, सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ मार्च तर बारावीची परीक्षा ५ एप्रिल रोजी संपणार आहे. लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेला २१ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.