पुणे: विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत पुणे विभागात धडक कारवाई केली. २८ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ६५ शाळांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दोन आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय परिसरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले होते. शाळांच्या ५० मीटर परिसरातील कँटीन, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या आणि दुकानांची तपासणी करण्यात आली. अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री तसेच आवश्यक परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान जनजागृतीसाठी पुणे विभागात २१ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तब्बल ५ हजार ७६२ शाळा आणि ६ हजार ६३२ शिक्षक सहभागी झाले. तसेच शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला व बालविकास अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेऊन मोहिमेच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला.

दरम्यान, पुणे विभागातील विविध ठिकाणी एफडीएच्या पथकांनी छापे टाकून अन्नपदार्थांची तपासणी केली. इंदापूर तालुक्यातील लकडी येथील आस्थापनामधील गायीच्या दुधाची तपासणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आढळले. याप्रकरणी १ लाख ३१ हजार ५६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
वारजे येथील एका मिसळ दुकानाच्या तपासणीत मानकापेक्षा जास्त प्रमाणात अयोग्य कृत्रिम रंगाचा वापर तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळला. त्यामुळे या हॉटेलचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात परवान्याशिवाय व्यवसाय आणि चुकीचे लेबलिंग आढळल्याने साठा जप्त करण्यात आला. खेड तालुक्यातही निकृष्ट दर्जाचा पांढरा वाटाणा जप्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. शालेय परिसरात अस्वच्छ किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा महाएफडीए पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






