पुणे: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला (Nilesh Ghaiwal) आवर घालण्यासाठी पोलिसांनी थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला असून, कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Pune Crime) आणि त्याच्या टोळीविरोधात दाखल करण्यात आलेले 6,455 पानांचे जंबो आरोपपत्र हे त्याचे ठळक उदाहरण ठरत आहे. गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या या प्रचंड आरोपपत्रामुळे घायवळ टोळीच्या गुन्हेगारी साम्राज्याला मोठा धक्का बसला असून, शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कोथरूड परिसरात आपली दहशत कमी होत चालल्याने नीलेश घायवळ अस्वस्थ झाला होता. परिसरावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने थेट हिंसाचाराचा मार्ग स्वीकारत गणेश विसर्जनाच्या दिवशीच मोठ्या कटाची आखणी केली होती. 6 सप्टेंबर 2025 रोजी टोळीतील सदस्यांना प्रवृत्त करताना, “तुम्ही फक्त धमाका करा, हत्यारे आणि पैसा मी देतो. कायदेशीर अडचण आली तर बाहेर काढण्याची जबाबदारी माझी,” असे सांगून त्याने गुन्ह्यासाठी उचकावल्याचे तपासात समोर आले आहे.
या कटाची अंमलबजावणी 17 सप्टेंबर रोजी रात्री मुठेश्वर मित्रमंडळ चौकात करण्यात आली. केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तेथे गप्पा मारत बसलेल्या नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, घायवळच्या घरातून दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या पुराव्यांमुळे आरोपींच्या विरोधातील गुन्हा अधिक मजबूत झाला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात ‘मकोका’ कायद्यांतर्गत कठोर कारवाई करत संघटित गुन्हेगारीचा कणा मोडण्याचा निर्धार केला आहे.
हजारो पानांचे आरोपपत्र म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रिया नाही, तर शहरातील गुंडगिरीविरोधात पोलिसांनी उचललेला निर्णायक दणका आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या फरार असलेल्या इतर साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, येत्या काळात आणखी मोठ्या अटकसत्राची शक्यता नाकारता येत नाही.






