पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात एका सोसायटीतील कार्यक्रमादरम्यान लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात मोठ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर मध्यरात्री कोंढवा पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आणि दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये कार्यक्रम सुरू असताना काही लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मुलांमध्ये मारामारी झाली. त्यानंतर काही मोठ्या व्यक्तींनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
घटनेची माहिती कोंढवा गावातील काही नागरिकांना मिळाल्यानंतर काही तरुण संबंधित सोसायटीत पोहोचले. त्यानंतर वाद अधिक वाढला आणि परिसरात तणाव निर्माण झाला. सोसायटीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने परिस्थिती गंभीर बनली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मारहाण झालेल्या काही मुलांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांतील लोक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या दरम्यान काही लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. तसेच काही जणांनी पोलीस ठाण्याबाहेरील रस्त्यावर बसून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला.
घटनेनंतर स्थानिक मान्यवर आणि नागरिकांनी दोन्ही गटांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीपर्यंत तणाव कायम होता. मात्र समजूत काढल्यानंतर जमाव पांगला. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून कोंढवा परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







