बारामती : निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय पवन ज्ञानेश्वर बोडरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात बोडरे कुटुंबातील तिन्ही भावंडांचा दुर्दैवी अंत झाला असून मुरूम (ता. फलटण) गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी (6 जून) सेजल ज्ञानेश्वर बोडरे (17), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (15) आणि त्यांचा भाऊ पवन बोडरे (10) हे मामाच्या गावी जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सेजल आणि अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता.

अपघातानंतर पवनवर सुरुवातीला बारामती येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
यापूर्वी रविवारी सेजल आणि अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता पवनच्या निधनाची बातमी समजताच बोडरे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका अपघातात कुटुंबातील तिन्ही लेकरांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
घटनेनंतर अनेक ग्रामस्थांनी बोडरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मुरूम गावात शोकमय वातावरण असून या दुर्दैवी घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे. अवघ्या काही क्षणांत एका कुटुंबातील तीन निष्पाप जीव हिरावले गेल्याने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तिन्ही भावंडांच्या आठवणींनी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.






