पुणे: पुण्यात घर घेणारांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. म्हाडा पुणे मंडळाने काही शिल्लक राहिलेल्या घरांचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना सामान्य प्रवर्गातील गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी आहे.
म्हाडाकडून राबवण्यात आलेल्या 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत काही घरांची मागणी कमी असल्यामुळे काही घरे शिल्लक राहिली आहेत. आता ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि पात्र असलेल्या अर्जदारांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटली जाणार आहेत.
यासाठी अर्ज कधी व कुठे करायचा?
म्हाडाकडून राबवण्यात आलेल्या योजनेसाठी अर्जाची सुरुवात 10 एप्रिल 2025 पासून होणार आहे. याबाबत https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळवर नोंद करावी लागणार आहे. ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. व आवश्यक असणारी सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
विकसकांकडून म्हाडाला जेवढ्या घरांची माहिती येईल, त्या त्या वेळेस ती घरे ऑनलाईन यादीत दिसतील. त्यामुळे अर्ज केलेल्या नागरिकांनी वेळोवेळी संकेतस्थळ तपासत राहावं.
याबाबत म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि सभापती शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “ही योजना पारदर्शक आहे तसेच गरजू नागरिकांना शहरात घर मिळावे यासाठी खास तयार केली आहे. त्यामुळे पात्र लोकांनी अर्ज करावेत.”