बारामती (पुणे) : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत अचानक भेट झाली. यावेळी दोघी नणंद-भावजयीने गळाभेट घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यादरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातून लढत होणार असल्याच्या चर्चा असतानाच आता दोघींनी गळभेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बारामती मधील जळोची येथे महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार त्या ठिकाणी आल्या व त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे तेथे येऊन पोहोचल्या. दोघींनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केले.
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. शरद पवार गटाने सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे.