पुणे: पाणीपुरवठा, मेट्रोचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच अडगळीत पडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुण्याला निधी द्यावा, यासाठी केंद्र तसेच, राज्याच्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी अजित पवारांकडे केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेत काँग्रेसच्या वतीने जोशी यांनी ही मागणी केली. आपल्या मागणीचे निवेदन जोशी यांनी अजित पवारांना दिले. त्यानंतर तातडीने पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून रखडलेल्या प्रकल्पांची माहिती घेत सूचना केल्या. या वेळी काँग्रेसचे दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सुरेश कांबळे उपस्थित होते.
काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून पुणे शहरासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद
याबाबत अधिक माहिती देताना जोशी म्हणाले, ‘शहरातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून फक्त पुणे शहरासाठी म्हणून जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहरविकास योजनेतून अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती. राज्य सरकारने ५०० कोटी रुपये दिले. या तीन हजार कोटी रुपयांमधून शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागले. शहरात समान पाणीपुरवठा योजना, नदीसुधार, मेट्रोचे विस्तारिकरण अशा योजना रखडल्या आहेत. या सर्व गोष्टी अर्थमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत.
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळेच दोन्ही सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पात फक्त पुणे शहरासाठी म्हणून विशेष भरीव आर्थिक तरतूद करून घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली, असल्याचे जोशी म्हणाले. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदी, रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा जाहिरात फलक, तसेच वाढती वाहतूक कोंडी यावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.