पुणे: दि. १ ऑक्टोबर २०२६ या पात्रता दिनांकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे बदल केले आहेत. आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत मतदार नोंदणी, दावे-हरकती आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखा नव्याने निश्चित केल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठविलेल्या पत्राद्वारे सुधारित कार्यक्रमास मंजुरी दिली. आयोगाच्या आदेशानुसार बीएलओमार्फत घराघर जाऊन मतदार पडताळणीची मोहीम आता ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे पुनर्रचनेकरण आणि पुनर्व्यवस्थापन करण्यात येईल.

सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत मतदारांना दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. या दावे-हरकतींवर २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात येईल.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सुधारित वेळापत्रकामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी आणि राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची लेखी माहिती द्यावी, असेही आयोगाने निर्देशित केले आहे.






