पुणे: काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई करत तडीपार गुंडासह 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तुले, 4 मॅगझीन आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हेवन पार्क ते लक्ष्मी पार्क दरम्यानच्या रस्त्यावर गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले.

हेवन पार्क परिसरात काही सराईत गुन्हेगार शस्त्रांसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आकाश संतोष भारती (वय 27, रा. महंमदवाडी रस्ता) आणि दीपक राम बिष्ट (वय 20, रा. हांडेवाडी रस्ता) यांना ताब्यात घेतले. तर फरार झालेला तडीपार गुंड गणेश बबन लोंढे (वय 25, रा. हडपसर) यालाही गुरुवारी अटक करण्यात आली. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







