पुणे : पीएमपीएमएलकडून मोफत पास योजनाही सुरु केली गेली आहे. पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार आहे. पुणे शहरात मेट्रो सुरु होण्यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची सेवा होती. शहरात अनेक मार्गांवर ही सेवा दिली जात होती. परंतु शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि अनेक भागात पीएमपीएमएल बसेस जात नव्हत्या. आता मेट्रो सेवेला जोडून काही मार्गांचा विस्तार पीएमपीएमएलकडून करण्यात आला आहे. आता एकूण सहा मार्गांचा विस्तार केल्यामुळे पुणे शहरातील नागरिकाना सुविधा मिळणार आहे.पीएमपीएल बसच्या एकूण सहा मार्गांचा विस्तार होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पीएमपीएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
‘या’ मार्गांचा विस्तार
- स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत
- नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत
- हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत
- सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत
- इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौकापर्यंत
- दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पास
पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. यासाठी पीएमपीएमएलकडून मोफत पास योजनाही सुरु केली आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार आहे. यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास दिली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पास देण्यात येईल . तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना 75 टक्के सबसिडीत पास दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.