आदित्य बोराटे

Indapur News: इंदापूर: इंदापूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता कराची वसूली वाढवण्यासाठी 100 टक्के शास्ती माफी देणारी अभय योजना मंजूर करण्यात आली असून ती आता इंदापूर नगरपरिषदेत लागू करण्यात आली आहे.
या योजनेनुसार, 18 मे 2025 पर्यंत थकीत असलेला मालमत्ता कर नागरिकांनी 31 मार्च 2026 पर्यंत भरल्यास करावरील संपूर्ण दंड माफ केला जाणार आहे. मात्र मूळ कराच्या रकमेत कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना फक्त दंडातून दिलासा मिळणार असून मूळ कर भरणे बंधनकारक राहणार आहे.
नगरपरिषदेने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेकडे अर्ज करणे गरजेचे आहे. संबंधित अर्जाची पडताळणी करूनच शास्ती माफीचा लाभ दिला जाणार आहे.
दरम्यान, ही योजना एकदाच लागू करण्यात येत असल्याने नागरिकांनी दिलेल्या मुदतीत कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदत संपल्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे इंदापूरमधील अनेक थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नगरपरिषदेलाही थकीत कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







