पुणे: सासू घरात राहत असल्याच्या रागातून पुण्यात एका व्यक्तीने सासूला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने सासुवर चाकू हल्ला केला. पुण्याच्या वाघोलीमध्ये ही घटना घडली आहे. आईला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मेहुणीवर देखील त्याने चाकू हल्ला केला. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
पुण्यातल्या वाघोलीमधील केसनंद रोडवर रोशन डेव्हिड मडलिक (वय ३९ वर्षे) हा आपल्या पत्नीसोबत राहतो. त्याच्या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सासू राहत होती. सासूचे इतक्या दिवस घरामध्ये राहणे रोशनला खटकत होते. त्यामुळे वारंवार त्याच्यामध्ये आणि सासुमध्ये हमरा तुमरी व्हायची.अशामध्ये बुधवारी ‘तू माझ्या घरी का राहतेस? आताच्या आता घरातून निघून जा’ असं म्हणत रोशनने सासूला मारहाण केली.
तेव्हा वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या मेहुणीवर त्याने चाकूने वार केले. यामध्ये त्याची मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सासूने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत जावायाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रोशन मडलिकविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. सध्या रोशनच्या मेहुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावयाने मारहाण केलेली पीडित महिला तिच्या छोट्या मुलीच्या घरी रहाते. जावई रोशनला सासूचे त्याच्या घरात राहणे अजिबात आवडत नव्हते. बुधवारी आल्यानंतर त्याने सासूला तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे तु माझ्या घरातून निधून जा म्हणत तिला शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित महिलेची मोठी मुलगी दिपालीने त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडली असता तिच्यावरही चाकूने वार केले.
तेव्हा रोशनने तिला शिवीगाळ करुन तू मध्ये का आलीस? असे म्हणून घरात जमिनीवर पडलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दिपालीच्या डाव्या हातावर मारून तिला जखमी केले. यावेळी पीडित महिला ही जावयाच्या हातातून चाकू काढून घेत असताना त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. या प्रकरणात लोणीकंद पोलिस अधिक तपास करत आहेत.