पुणे : सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसमधून उतरताना पाय घसरून रस्त्यावर पडलेल्या 25 वर्षीय विद्यार्थिनीला मागून आलेल्या स्कूल बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात कांचन बळवंत खड्डा (वय 25, मूळ रा. हनुमानगड, राजस्थान) हिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कांचन ही खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एमटेकच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती संस्थेच्या कृष्णा हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक असल्याने ती खडकवासला येथून पीएमपी बसने निघाली होती.

सकाळी पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर पीएमपी बस थांबली. बसच्या पुढील दरवाजातून उतरत असताना कांचनचा अचानक पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली. त्याच वेळी स्वारगेटच्या दिशेने जाणारी स्कूल बस मागून आली. रस्त्यावर पडलेल्या कांचनला या बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीएमपी आणि स्कूल बसच्या चालकांना ताब्यात घेतले असून, दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, दोन्ही चालकांची भूमिका काय होती आणि त्यावेळी वाहनांची स्थिती कशी होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कांचनने बनारस हिंदू विद्यापीठातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने डीआयएटीमध्ये ‘सेमीकंडक्टर चिप डिझाइन’ विषयात एमटेकला प्रवेश घेतला होता. या विषयात पुढे पीएच.डी. करण्याचे तिचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने तयारीही सुरू केली होती.
तरुण आणि होतकरू विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह सहकारी विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर सकाळच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.







