पुणे : प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीशी ओळख झाल्यानंतर त्याच्याकडून खाण्यापिण्याची वस्तू स्वीकारणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. पुण्यातील या घटनेत अनोळखी व्यक्तीने ओळखीचा गैरफायदा घेत ज्येष्ठ नागरिकाला गुंगीचे पदार्थ दिल्याचा संशय असून, त्यानंतर त्यांच्या हातातील सुमारे 50 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुंबईत वास्तव्यास असून त्यांचे वडील कामानिमित्त पुण्याला येत होते. 20 ऑगस्ट रोजी त्यांनी बोरिवली ते स्वारगेट असा शिवशाही बसने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती येऊन बसली. काही वेळाने दोघांमध्ये संवाद सुरू झाला. आरोपीने ज्येष्ठ नागरिकाशी बोलत त्यांच्याशी ओळख निर्माण केली.

प्रवास सुरू असतानाच या अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला खाद्यपदार्थ दिला. त्यांनी तो पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना गुंगी येऊ लागली. त्यानंतर ते बसमध्येच बेशुद्ध झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिक गुंगीत असल्याची संधी साधून शेजारी बसलेल्या संशयिताने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. या अंगठीची किंमत सुमारे 50 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने ज्येष्ठ नागरिक शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या हातातील अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या मुलाला सांगितला.
घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बसमधील प्रवासादरम्यान नेमके काय घडले, संबंधित संशयित कोण आहे आणि त्याने ज्येष्ठ नागरिकाला गुंगीचे पदार्थ दिले होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींशी ओळख झाल्यानंतर त्यांच्याकडून कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारताना प्रवाशांनी सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.







