फुरसुंगी : जुन्या भांडणाच्या रागातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची लोखंडी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली. मंगळवारी (ता. 17) सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रेल्वे पटरीजवळ भोसले व्हिलेज परिसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फुरुसुंगी पोलिसांनी चार अल्पवयीन बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण रविंद्र नागटिळक (वय 17, रा. भोसले व्हिलेज, दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी करणची बहीण सोनाली रविंद्र नागटिळक (वय 22) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 17) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रेल्वे पटरीजवळ जुन्या भांडणाच्या रागातून काळेपडळ येथील संशयितांनी करण याच्यावर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर तसेच दोन्ही हातांवर वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी करणची बहीण सोनाली नागटिळक (यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण नागटिळक याचे नाव यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात चर्चेत आले होते. अल्पवयीन असताना एका खून प्रकरणात सहआरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, अल्पवयीन असल्याने त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर काळे बोराटे नगर परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा होती.
दरम्यान, हातात कोयता घेऊन रात्रीच्या वेळी परिसरात फिरतानाचे त्याचे व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या हत्येमागील नेमके कारण काय, आणि या घटनेमागे पूर्ववैमनस्य आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलिस करीत आहेत.






