नागपूर : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अत्यंत धक्कदायक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’ या बनावट वृत्तवाहिनीच्या नावाचा गैरवापर करून देशभरातील आठ राज्यांमधील तब्बल 618 सरपंच व ग्रामसेवकांना खंडणी मागणाऱ्या चार महिलांच्या मुख्य टोळीला पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे.

या टोळीची कार्यपद्धत अतिशय सुनियोजित होती. आरोपी महिलांनी भोपाळमध्ये तीन कॉल सेंटर्स सुरू केले होते आणि तिथे तब्बल 35 तरुणींना कामावर ठेवले होते. या तरुणी विविध राज्यांतील सरपंच व ग्रामसेवकांचे मोबाईल नंबर गोळा करायच्या. त्यानंतर ‘आमच्या चॅनेलसाठी जाहिरात द्या किंवा वार्षिक वर्गणी काढा, नाहीतर तुमच्याविरोधात भ्रष्टाचाराची खोटी बातमी प्रसिद्ध करू’ अशी भीती घालून त्या सरपंचांना ब्लॅकमेल करत असत. विशेषतः महिला सरपंचांना जास्त टार्गेट केले जात होते.
ग्रामीण पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे भोपाळमध्ये छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य चार महिला सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, त्यांच्याकडून कॉल सेंटरमधील संगणक, मोबाईल आणि इतर बनावट कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे जाळे मध्य प्रदेशसह एकूण आठ राज्यांत पसरले होते. आतापर्यंतच्या तपासात 618 जणांना अशा प्रकारे धमकावल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी सध्या कसून चौकशी सुरू आहे. प्रशासकीय पदावर असलेल्या महिला आणि सरपंचांना अशा धमक्यांना घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.






