मुंबई, ता. 16 : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील खरीप हंगामावर गंभीर संकट ओढवले आहे. अनेक भागांत पिके करपली असून पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पावसाची स्थिती आणि खरीप हंगामाच्या नुकसानीवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय आपत्ती निधीच्या (NDRF) निकषांनुसार पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पंचनामे सुरू होण्यापूर्वीच टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना सुरुवात करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जूनमध्ये पावसाने अपेक्षित सुरुवात केली नाही. त्यानंतर जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या सरासरीपर्यंत पोहोचल्या आणि धरणसाठ्यांमध्येही वाढ झाली. मात्र, ऑगस्टपासून पावसाने पुन्हा मोठी दडी मारल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांमधील 86 तालुक्यांत 30 दिवसांपर्यंत पावसाचा खंड नोंदवला गेला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील 31, पश्चिम महाराष्ट्रातील 17, मराठवाड्यातील 16 आणि विदर्भातील 22 तालुक्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यात 43 दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही. इंदापूरसह काही तालुक्यांत सुमारे 40 दिवसांचा पावसाचा खंड नोंदवण्यात आला आहे.पावसाअभावी मूग, मटकी आणि चवळी यांसारखी कमी कालावधीत येणारी कडधान्ये वाया गेल्याचे चित्र आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या भागांत पिकांची काढणी करूनही अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. उसाची वाढ खुंटली असून नव्या ऊस लागवडीसमोरही पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
कृषीमंत्री दुष्काळी भागांच्या पाहणीवर
दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सोमवारपासून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात अकोला, वाशीम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांचा दौरा करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पाहणी केली जाणार आहे.
दरम्यान, देशातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला 19 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून सुरुवात होण्याची शक्यता आहे. 1 जून ते 14 सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाची सुमारे 15 टक्के तूट, तर महाराष्ट्रात 16 टक्के तूट नोंदली गेली आहे.






