पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करून दूध, खवा, तूप, मिठाई आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेण्यात आले. या कारवाईत ३० लिटर दूध आणि ४१३.७ किलो दुग्धजन्य पदार्थ व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला असून, जप्त मालाची एकूण किंमत १५ लाख ५८ हजार ७२ रुपये आहे.

या कालावधीत एफडीएच्या पथकांनी राज्यातील ३८ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये दूध, खवा, तूप आणि मिठाईसह विविध ४७ खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अंधेरी येथील आयुष मिल्क सप्लायरकडून ६ हजार ४४० रुपये किमतीची २३ किलो बर्फी, तर मुलुंड येथील ब्रिजवासी मिठाईयांकडून ६० हजार ३०० रुपये किमतीचा २२५ किलो खवा जप्त करण्यात आला.

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई, पुणे आणि अन्य भागांतील काही नामांकित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलाबा येथील कॅफे मोंडेगरच्या तपासणीत गरम पदार्थ योग्य तापमानावर न ठेवणे, कोल्ड स्टोरेजमध्ये आवश्यक तापमान न राखणे, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि उपकरणांची योग्य स्वच्छता नसल्याचे आढळले. त्यामुळे या कॅफेचा परवाना निलंबित करण्यात आला.

याशिवाय खार येथील रुहाफजा बेकरी आणि गुलशन डेअरी फार्म, अंधेरीतील चंद्रूज प्युअर घी स्वीट्स आणि शर्मा डेअरी अँड फास्ट फूड, ग्रँट रोडमधील पंजाबी चंदू हलवाई एलएलपी, विलेपार्ले येथील श्री नारायण डेअरी, घाटकोपरमधील त्रिभुवन डेअरी फार्म आणि महावीर कॅश्यू अँड फूड्स, कांदिवलीतील महाराष्ट्र बिर्याणी सेंटर आणि जोगेश्वरीतील अग्रवाल स्वीट मार्ट यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कांजूरमार्ग येथील कृष्णा स्वीट्स अँड स्नॅक्सला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पुण्यातील पुरमचंद अँड सन्स येथे कालबाह्य खाद्यपदार्थ आढळल्याने, तर कोल्हापूरमधील हॉटेल मल्हार वाड्या यांच्यावरही परवाना निलंबनाची कारवाई झाली.
दरम्यान, जालना आणि बीड जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याविरोधातही एफडीएने मोठी कारवाई केली. जालन्यात ९५ लाख ३० हजार ४६४ रुपये किमतीचा गुटखा व अन्य प्रतिबंधित पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरलेली ४० लाख रुपयांची वाहने असा एकूण १ कोटी ३५ लाख ३० हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बीडमध्ये ३ लाख ६३ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि ७ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली.
गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून जनजागृतीवरही भर देण्यात आला आहे. मुंबईत भंडाऱ्यासाठी केवळ परवानाधारक किंवा नोंदणीकृत आस्थापनांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांच्या ३२० पदाधिकाऱ्यांसाठी पाच विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या असून, बीएमसीच्या सहकार्याने मोदक तयार करणाऱ्या ११० महिला बचत गटांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.







