पुणे: पुण्यातील बुधवार पेठेत एका अल्पवयीन मुलीची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीला तिच्याच एका मैत्रिणीने 3 लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला पीडित मुलीला धमकी देऊन तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. मागील पाच महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार होत होता.
अल्पवयीन मुलीने 7 एप्रिल रोजी बुधवार पेठेतून पळ काढला. बस पकडून ती हडपसर भागात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तिने घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी 5 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची बांगलादेशची रहिवासी असून तिचं वय 16 वर्षे 2 महिने इतकं आहे. काही दिवसांपूर्वी कामाच्या निमित्ताने तिच्या मैत्रीणीने बेकायदेशीरपणे भारतात आणले होते. त्यानंतर त्या दोघी काही काळ पुण्यातील भोसरी परिसरात राहत होत्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने पीडितेला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे 3 लाख रुपयांना विकले.
पीडित मुलीने बुधवार पेठेतून काढला पळ
संबंधित महिलेनं पीडित मुलीला “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” अशी भीती दाखवून तिला तिला एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला. पण अत्याचार असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने बुधवार पेठेतून पळ काढला. पोलिसांत जात घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.