पुणे: राज्यात पावसाची सक्रियता कायम असून 1 ऑगस्ट रोजीही अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून नंदुरबारसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मात्र पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असली तरी या विभागासाठी कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांत विशेष इशारा नसला तरी अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे.
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर जाणे टाळावे आणि शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.







