पुणे : अल्पवयीन मुलींचे, चांगल्या कंपनीत नोकरी करत असलेल्या महिलांचे पाठीमागून फोटो काढून ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्याऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या तरुणाने शेकडो हुन अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारीत केल्याचे आढळून आले. किसन हनुमंत तोरडमल (वय 27, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन तोरडमल हा हडपसरमधील एका कंपनीत नोकरीला आहे. मागच्या एका वर्षापासून तो महिला व तरुणी यांचे पाठीमागून व्हिडिओ तसेच फोटो काढून ते इन्स्टाग्राम वर टाकत होता. तसेच त्याखाली तो अश्लिल कमेंटही करतो. हा प्रकार एका 40 वर्षाच्या महिलेच्या व आणखी एका तरुणीच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सुचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार अविनाश् गोसावी, महावीर लोंढे यांनी तांत्रिक तपास केला त्यात किसन तोरडमल याचे नाव समोर आले. किसन याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचे सोशल मीडियावरील अकाऊंट, मोबाईल याची तपासणी केल्यावर तो गेल्या वर्षभरापासून असे विकृत उद्योग करीत असल्याचे आढळून आले. तो रस्त्याने जाणार्या, वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेल्या महिलांचे पाठी मागून विकृत व्हिडिओ काढत होता. अशा शंभर हुन अधिक महिलांचे व तरुणींचे व्हिडिओ त्याने काढले असल्याचे समोर आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, महावीर लोंढे, प्रकाश सावंत, सुनील आव्हाड यांनी केली आहे.