पुणे : शिवणे भागातील लाँन्ड्री व्यावसायिकाकडे प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. लाँन्ड्री व्यावसायिकाने या इसमा विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
या भागाचा मी दादा आहे; गुंडाचा लाँन्ड्री व्यावसायिकाला दम
याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात एका सराइताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत एका लाँन्ड्री व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाँन्ड्री व्यावसायिक तक्रारदाराचे एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात दांगट पाटीलनगर येथे इस्त्री आाणि कपडे धुलाईचे छोटेशे दुकान आहे. सराइत आरोपी तीन दिवसांअगोदर शिवणे भागात आला होता. त्याच्याकडे लोखंडी गज होता. ‘या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर मला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता म्हणून द्यावे लागतील’, अशी धमकी त्याने लाँन्ड्री व्यावसायिकाला दिली. एवढंच नाही तर पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी देखील त्याने दिली.
त्यानंतर सराइताने लाँन्ड्री व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भागातील एका मोटारीची काचही त्याने फोडली. शिवणे भागातील दांगट पाटीलनगर या परिसरात लघुउद्योजकांचे उद्योग आहेत. यापूर्वीही या भागातील आणखी एका व्यावसायिकाला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे. कारखाना पेटवून देण्याची धमकी सुद्धा दिली होती. मी पोलिसांना भित नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला होता. या प्रकरणी घाबरलेल्या व्यावसायिकाने वारजे पोलिसांकडे तक्रार दिली आहे . पसार झालेल्या या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरसट या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
माळवाडीत तडीपार गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल
गुंडाने किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडे खंडणीची मागणी केल्याची घटना हडपसर भागातील माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी तडीपार गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किराणा माल दुकानदाराने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराइताला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी सरात गुंड रात्री माळवाडीतील किराणा माल दुकानात आला होता. त्याने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखविला. आणि शस्त्र उगारुन त्याने दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुलाणी अधिक तपास करत आहेत.