सागर जगदाळे
भिगवण : जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घेतलेल्या महिला सभेत गावातील प्रत्येक मुलीचा विवाह हा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच करण्यात यावा, कोणत्याही मुलीचे शिक्षण अर्धवट ठेवुन तिचा घाईगडबडीत विवाह केला जाऊ नये, यासाठी महिलांनी एकमताने ठराव पास केला.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पूनम मदने यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुजा वेताळ, हिना शेख, धनाजी मत्रे, पद्माकर कांबळे, ग्रामसेविका स्वाती लोंढे, मच्छिंद्र मदने तसेच सर्व अंगणवाडीसेविका, आशासेविका, पोस्टमन सृष्टी बाबर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना या योजनांचा लाभ देण्याकरिता कॅम्प घेण्यात आला. यामध्ये गावातील प्रत्येक १ ते १० वयोगटातील मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत उघडून देण्यात आले.
तसेच गावातील सर्व महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत रजिस्टर वाटप करण्यात आले व सर्व महिला कर्मचार्यांचा, सफाई कर्मचार्यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी धनाजी मत्रे, मच्छिंद्र मदने, अनुजा वेताळ, स्वाती लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मच्छिंद्र मदने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महमंद शेख, तुकाराम गोलांडे यांनी प्रयत्न केले.