पुणे : पुण्यातील वारजे परिसरातील फोर्ड या प्रसिद्ध कार कंपनीच्या ‘सर्व्हिस सेंटर’ कडून माजी कर्मचाऱ्यानेच तब्बल 20 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय संपत म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित शंकर दुरकर (वय 35, रा. पुरंदर, जि. पुणे) यांनी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ड कार कंपनीचे सर्व्हिस सेंटर असलेली ढोणे कार प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यातील वारजे भागात आहे.आरोपी विजय म्हस्के हा 5 वर्षांपूर्वी याच कंपनीत कामाला होता. परंतु काही कारणाने त्याने ही नोकरी सोडली होती. त्यानंतर विजयने तो वकील झाल्याचे त्याने सगळ्यांना सांगितले. दरम्यान, पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचे कारण सांगून म्हस्के याने ढोणे कार प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे तक्रार करीत कंपनीला नोटिस पाठविली.
दरम्यान, विजय म्हस्केने आपला साथीदार अविनाश रोकडे याच्या मार्फत ही नोटिस मागे घेण्यासाठी कंपनीकडून 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर थेट मंत्रालयात अर्ज करून कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर अमित दुरकर यांनी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदर घटना कळल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे करीत आहेत.