बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुरुवातीला प्रशासनाने यांचे नाव टाकले नव्हते. मात्र, यावरून राजकीय स्तरावर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अखेर या कार्यक्रमाची सुधारित पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये शरद पवार यांचे नाव टाकण्यात आले आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलामध्ये ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन शनिवारी (दि.२) करण्यात आले असून, या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू होत्या.
शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहर व जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमध्ये आपले नाव टाकू नये, अशा सूचना राज्य शिष्टाचार विभाग व जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले होते. असे असले तरीही त्यांचे नाव न टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. या सर्व घडामोडीनंतर शुक्रवारी प्रशासनाकडून नव्याने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये नाव टाकण्यात आले आहे.