पुणे : नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात दुधाचा ट्रँकर आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले असल्याची माहिती टोकवडे पोलिसांनी दिली आहे. ही घटना माळशेज घाटाजवळील आवळ्याची वाडी (ता. मुरबाड जि. ठाणे) येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी 3 मे रोजी घडली.
या अपघातात अक्षय शांताराम दिघे (वय-३३), तेजल अक्षय दिघे (वय-२६ रा.पांगरी) टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (रा. पिपळवंडी) हे जागीच ठार झाले. टेम्पो चालक शकील अमजत शेख (रा. बादशाह तलाव, जुन्नर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आरूष अक्षय दिघे (वय-३) हा जखमी असून आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत निसार लतीफ पठाण यांनी टोकवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नावरून दुधाच्या टँकरमध्ये बसून मुंबईला परत जात होते. त्यावेळी कल्याणकडून जुन्नरच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू टेम्पोची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली .
ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये टँकरची दुधाची टाकी तुटून बाजूला पडली. तर मालवाहू पिकअपचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दिघे दाम्पत्य
आणि टँकर चालक जागीच ठार झाले. तर टेम्पो चालकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत ३ वर्षाचा आरूष सुदैवाने बचावला. पुढील तपास टोकवडे पोलीस करत आहेत.