पुणे : वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. येथे ताडी दुकानात ताडी पिण्यावरुन झालेल्या भांडणात तीन जणांनी एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यानंतर दरवाजाच्या लोखंडी चौकटीवर ढकलले. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

मलंग मेहबूब कुरेशी (वय 60 वर्ष , रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सोहेल कुरेशी (वय 28 वर्ष) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अदिल शेख (वय 31 वर्ष), पांडा ऊर्फ पांडुरंग नामदेव पवार (वय 50 वर्ष) यांना अटक केली आहे. तर आकाश धांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वानवडीतील शांतीनगर येथील ताडीच्या दुकानात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मलंग कुरेशी वानवडीतील शांतीनगर भागात एका ताडी विक्री दुकानात गेले होते. तेथे ताडी पित असताना आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. आरोपी शेख, धांडे आणि पांडा यांनी कुरेशी यांना बेदम मारहाण करत त्यांना दुकानाच्या लोखंडी चौकटीवर ढकलून दिले. तेंव्हा कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर कुरेशी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यु झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत.








