पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात आता मृतांच्या नेमक्या संख्येवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक स्तरावरील माहितीनुसार मृतांचा आकडा 23 वर पोहोचल्याचे सांगितले जात असताना, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मात्र 15 मृत्यूंचीच नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा कमी दाखवला जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Pune Toxic Liquor Case)

या प्रकरणी दापोडी आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून तपास 29 मे रोजी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडीच्या माहितीनुसार, दापोडी परिसरात 11 आणि हडपसर परिसरात 4 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 15 आहे. तसेच दापोडी येथील गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मात्र, विविध रुग्णालयांमधील माहिती आणि स्थानिक स्तरावरील आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये 15 तर पुण्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मृतांचा आकडा 22 वर पोहोचत असल्याचे दिसते. याशिवाय रविवारी सायंकाळी ससून रुग्णालयात आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचा अधिकृत आकडेवारीत समावेश झाला नाही का? काही मृत्यूंची नोंद अद्याप संबंधित गुन्ह्यांमध्ये करण्यात आलेली नाही का? की अधिकृत नोंदींमध्ये मृतांचा आकडा कमी ठेवण्यात येत आहे? याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, हडपसरमधील पांढरेमळा परिसरातील सचिन सोनवणे (वय 42) यांचा विषारी दारू सेवनानंतर प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 मे रोजी त्यांनी हातभट्टीची दारू सेवन केल्याचे सांगितले जात असून, रविवारी प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.







