पुणे: चेन्नई येथील स्विच कंपनीकडून मागविण्यात आलेली डबलडेकर बस (Double Decker Bus) सोमवारपासून (15 सप्टेंबर) हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या आयटी हबकडे (Pune IT Hub) जाणाऱ्या रस्त्यांवर धावणार आहे. पुढील आठवडाभर या बसची चाचणी घेण्यात येणार असून, पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर पुण्यातही डबलडेकर बस चालविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पीएमपी प्रशासनाने गेल्या 5 वर्षांपासून डबलडेकर बस सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू ठेवली होती. प्रस्ताव तयार होऊनही अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पीएमपीने आयटी क्षेत्रात डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चेन्नईतील स्विच कंपनीसोबत बैठक घेण्यात आली आणि बसच्या चाचणीसाठी पथकाला निमंत्रण देण्यात आले आहे.
हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा या आयटी पट्ट्यातील रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या परिसरातच डबलडेकर बसची चाचणी घेण्यात येणार आहे. या दरम्यान रस्त्यांवरील कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ, बसची क्षमता आणि वाहतुकीवरील परिणाम या सर्वांचा अभ्यास होणार आहे. यावरून पुढील मार्ग आखणी निश्चित केली जाणार आहे. कंपनीचे अधिकारी आणि पीएमपीचे शिष्टमंडळ या चाचणीदरम्यान सोबत असणार आहेत.
प्रत्येकी 2 कोटी रुपये किंमत असलेली ही वातानुकूलित इलेक्ट्रिक बस 70 प्रवाशांच्या आसन क्षमतेसह उपलब्ध आहे. प्रवास आरामदायी होण्यासोबतच तिच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. ही बस इलेक्ट्रिक असल्यामुळे प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच शहरातील मेट्रोचे पादचारी पूल, मार्गिकांमुळे अडथळे निर्माण होतात का किंवा इतर काही तांत्रिक व वाहतूकविषयक समस्या उद्भवतात का, याचा सखोल अभ्यास या चाचणीदरम्यान केला जाणार आहे.
पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले, “सोमवारपासून (15 सप्टेंबर) पुढील आठवडाभर विविध रस्त्यांवरून या डबलडेकर बसची चाचणी घेण्यात येणार आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार तपासण्या करून मार्ग आखणी केली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल.”







