पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला असून, या प्रकारामुळे बाळाच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. बाळावर सध्या ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी अल्ताप नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सानिया शेख, रियाज इमाम हाल्याळ (रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास लोहगावमधील कलवड वस्ती येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी अल्ताप शेख आणि त्यांच्या भावामध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. याच जुन्या वादातून सानिया शेख हिने अल्ताप यांच्या नऊ महिन्यांच्या अली या मुलाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकल्याचा आरोप आहे. काही वेळानंतर बाळाला उलट्या होऊ लागल्या. त्याची आई जैनाब शेख यांनी बाळाचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याचे पाहिले आणि तातडीने पतीला याची माहिती दिली. त्यानंतर बाळाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले.

या घटनेबाबत जैनाब शेख यांनी सानिया शेखला विचारणा केली असता, कोणाला काही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच आरोपीचे नातेवाईक रियाज हाल्याळ आणि हाजी मलंग शेख हे रुग्णालयात येऊन, मुलगा व्यवस्थित आहे, तरीही तक्रार दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फेव्ही क्विकमध्ये सायनोअॅक्रिलेटसारखे रासायनिक घटक असतात. हवेशी संपर्क होताच हे द्रव्य झटपट घट्ट होत असल्याने मानवी शरीरासाठी ते धोकादायक ठरू शकते. विशेषतः लहान मुलांच्या तोंडात किंवा शरीरात गेल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता असते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.







