पुणे : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. हा पक्ष लवकरच सत्ताधारी एनडीए आघाडीत सामील होऊ शकतो, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. जरी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या चर्चां पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अचानक एक कठोर आणि मोठा निर्णय घेतला आहे.

पक्षाने आपल्या सर्व अधिकृत वक्त्यांच्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत. आता पक्षाची बाजू मांडण्यासाठी केवळ दोनच वरिष्ठ नेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सहीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे दोघेच प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करतील.

पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की, 4 ऑगस्ट 2026 पासून पूर्वीच्या सर्व प्रवक्ता नियुक्त्या पुढील आदेश येईपर्यंत मागे घेण्यात येत आहेत. या काळात इतर कोणत्याही नेत्याला किंवा प्रवक्त्याला पक्षाच्या वतीने विधान करण्याचा अधिकार असणार नाही. सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी आणि माध्यमांनी या निर्णयाची त्वरित नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. एनडीए प्रवेशाच्या चर्चांमुळे पक्षात निर्माण गोंधळ टाळण्यासाठी आणि चुकीची वक्तव्ये रोखण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. आता भविष्यात जेष्ठ नेते शरद पवार नक्की कोणती राजकीय दिशा स्पष्ट करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








