पुणे: झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पाेलिसांनी लोणावळा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. अगोदरच त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अशी माहिती समोर आली आहे. पोलीय आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपी चोख्या तुकाराम येळवंडे याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली होती. कारवाईनंतर त्याला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
आरोपी लोणावळ्यात असल्याचा पोलिसांना सुगावा
कारवाईची माहिती मिळाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. गुन्हे शाखा, तसेच वारजे माळवाडी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो सतत राहण्याच्या ठिकानामध्ये बदल करत होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक संजय नरळे आणि तपास पथक आरोपी येळवंडेच्या शोधात होते.आरोपी लोणावळ्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, साळुंखे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, प्रशांत चव्हाण, रियाज शेख, विजय खिलारी, किरण तळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
आरोपी येळवंडे विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार
आरोपी येळवंडे याने जून २०२१ मध्ये रवींद्र तागुंदे याच्यावर गोळीबार केला होता. या गुन्ह्यात येळवंडेसह साथीदारांना अटक करून पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मागच्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपी येळवंडेला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा वारजे माळवाडी भागात गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपीला दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपार केल्यानंतर तो पुन्हा शहरात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते.