पुणे: शहराच्या चकचकीत स्पा आणि मसाज (Crime News) सेंटर्सच्या पडद्याआड सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटला पुणे पोलिसांनी मुळापासून उखडून फेकले आहे. कुख्यात आंतरराज्यीय दलाल धनराज शामराव जाधव याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई करत त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात केली आहे. ही केवळ एक अटक नसून, मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा बाजार मांडणाऱ्या टोळ्यांना दिलेला हा कडक इशारा आहे.

गेल्या काही वर्षांत पुणे, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांत स्पा सेंटर्सचे जाळे पसरले आहे. धनराज जाधव याने याच व्यवसायाचा वापर आपल्या गुन्हेगारी साम्राज्यासाठी केला. तो केवळ स्थानिक दलाल नव्हता, तर परराज्यातील तरुण मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना देहविक्रीच्या जाळ्यात ओढण्याचे एक संघटित रॅकेट तो चालवत होता. पुणे, पिंपरी-चिंचवड ते थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत त्याचे धागेदोरे पसरले होते. वानवडीतील एका छाप्यानंतर त्याचे नाव उघड झाले आणि तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
सामान्यतः अशा गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात. मात्र, धनराजविरुद्ध अनेक शहरांत गंभीर गुन्हे दाखल असल्याने, त्याच्यावर वचक बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी एमपीडीए लावला. या कायद्यामुळे त्याला किमान एक वर्ष जामीन मिळणार नाही. कायदेशीर प्रक्रियेतून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे.








