पुणे: पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रातून एक बातमी समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तलं तसेच चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हा करण्याच्या उद्देशाने ही पिस्तुले संबंधित आरोपीने बाळगली होती. मात्र काळेपडळ पोलिसांच्या पथकाने तत्पूर्वीच आरोपीला अटक केली आहे.
अजिम उर्फ आंट्या मोहम्मदहुसेन शेख (वय 25, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. आरोपी शेख याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या आदेशान्वये 18 एप्रिल रोजी तपास पथकाचे सहायक निरीक्षक अमित शेटे आणि कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार नासीर देशमुख यांना अशी माहिती मिळाली की, आरोपी शेख हा महंमदवाडी येथील हेवनपार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या तिथे लपलेला आहे. तसेच कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याने शस्त्र बाळगले आहे. बाळगलेले शस्त्र हे पिस्तूल असण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना मिळाली.
दरम्यान, सहायक निरीक्षक शेटे यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक पाटील यांना कळविली. त्यानंतर पाटील यांनी आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांच्या तपास पथकाने पालखी मार्ग परिसरातील हेवन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरून घेराव घालून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा 81 हजार 600 रुपय किमतीचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी संबंधित पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली.
सदर कारवाई, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सुचनांनुसार सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांच्या पथकाने केली.