पुणे : पुण्यातील नामांकित ‘द न्यू पूना क्लब’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. क्लबच्या स्वयंपाकघराची पाहणी केल्यानंतर अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने क्लबचा अन्नपरवाना निलंबित केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील क्लब वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान क्लबच्या किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे आढळले. स्वयंपाकघरात जिवंत झुरळे फिरताना दिसून आली, तसेच विविध ठिकाणी उंदराची विष्ठाही आढळून आली. याशिवाय किचनमध्ये पाणी साचल्याचे आणि काही ठिकाणी तेलकट व चिकट पृष्ठभाग असल्याचे तपासणीत समोर आले.

खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फ्रीजच्या जवळच अस्वच्छ शौचालय असल्याचेही एफडीएच्या पाहणीत आढळले. अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या परिसरात अशा प्रकारच्या अस्वच्छ परिस्थितीमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यातील नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एफडीएने क्लबचा अन्नपरवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लब प्रशासनाने स्वयंपाकघरातील सर्व त्रुटी दूर करून आवश्यक स्वच्छता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. संबंधित त्रुटी दूर करून अन्नसुरक्षेचे नियम पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत अन्नपरवाना निलंबित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे शहरातील इतर हॉटेल्स आणि क्लबमधील अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या व्यवस्थेकडेही लक्ष वेधले गेले आहे.






