पुणे, ता. 11 : साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास वानवडी पोलिसांना शनिवारी (ता. 10) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. पोलिसांनी या छाप्यात हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 3 हजार 215 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नारायण मगर थापा (वय-33 रा. शिवनेरीनगर, लेन नं.15 .कोंढवा, पुणे), चंदनकुमार श्रीतेवन राय (वय 22, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे), इनायत मजिद सल्ला (वय-52, रा. भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे) व जावेद मलिक शेख (वय-42 रा. पूना कॉलेज समोरील वस्ती, गोळीबार मैदान, कॅम्प, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेळोवेळी सुचना दिल्या असुन, पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होणार नाहीत. यासाठी पाठपुरावा केला जात असुन, अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे व त्याच्या सहकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलीस हवालदार अमोल पिलाने व पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन या हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरु आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून पर्दापाश केला आहे. याप्रकरणी हॉटेल चालकासह 4 जणांवर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 4-अ, 21-अ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे गोविंद जाधव, उपनिरीक्षकधनाजी टोणे, रमेश साबळे, पोलीस हवालदार अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, यतीन भोसले दया शेगर, व सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने केली आहे.