पुणे: गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या एका गुंडाचे जंगी स्वागत करण्यात आले. रस्त्यावरच आरडा ओरडा व धिंगाणा घालुन परिसरात दहशत माजविल्याची घटना घडली आहे. ही घटना येरवडा येथील गुंजन चौकात मंगळवारी (ता.7) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 50 हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. सर्वे नंबर 12 लक्ष्मी नगर येरवडा पुणे), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे,अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, ना न्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे, व इतर 35 ते 40 इसमांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2),190,223,281, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 37 (1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार लहू एकनाथ गडमवाड यांनी सरकारच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लहू गडमवाड हे एक पोलीस अंमलदार असून येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर आरोपी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे हा गुन्हेगार असून त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे हा पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील गुन्हेगार असून तो गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता.
दरम्यान, गडमवाड हे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री गस्त घालत होते. तेव्हा गुंजन चौकात जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसमांनी त्याचे जंगी स्वागत केले. आरोपी हे चार चाकी गाड्या व वीस ते तीस दुचाकी गाड्या वरून आले होते. आरोपींनी बेकायदा जमाव जमविला होता. आरोपींनी बेदरकारपणे गाड्या चालवून आरडा ओरडा केला. तसेच घोषणाबाजी करून येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार लहू गडमवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात 50 हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके करीत आहेत.